चाळीसगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी 2 ऑक्टोबर, 2014 पासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरु झाली. या अभियानास तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने स्वच्छता हीच सेवा या विषयावर एक राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शुक्रवार 15 सप्टेंबर ते 2 आक्टोबर 2017 या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन मोहीम राबविण्यात येत आहे. चाळीसगाव येथे नगर परिषदेमार्फत शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेचा 15 सप्टेंबर, 2017 रोजी औपरिकरित्या प्रारंभ करण्यात आला.
समाजातील सर्वांचा श्रमदानात सहभाग
यावेळी नगराध्यक्षा आशालता पाटील यांच्याहस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून पूजन करण्यात आले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी उपस्थितांना या मोहीमेची माहिती दिली. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या मोहीम कालावधीत श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करणे, समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करुन घेऊन समग्र स्वच्छता करणे, शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव स्वच्छतागृहांची सफाई करणे असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी उपाध्यक्ष आशाबाई चव्हाण, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक, नगरसेविका, इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.