चाळीसगाव। शहरातील सिग्नल पॉइंटवर 5 ते 6 च्या जमावाने मेहुणबारे येथील तरुणावर प्राणघातक हल्ला करुन तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवार 3 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असुन जखमी तरुणावर येथील देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात व गजबजलेल्या ठिकाणी सिग्नल चौकात हा थरार घडल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. जखमीस लागलीच येथील देवरे हॉस्पिटल मध्ये दाखल करुन त्यावर उपचार सुरु आहेत. सिग्नल पॉइंट वर सीसीटीव्ही यंत्रणा असल्याने आरोपी लवकरच पोलीसांना सापडण्याची शक्यता आहे.
सहा तरूणांनी घेराव घालुन केली मारहाण
याबाबत प्राप्त माहितीनुसार मेहुणबारे ता चाळीसगाव येथे सिद्धिविनायक ईलेक्ट्रॉनिक दुकान चालवणारा 22 वर्षीय तरुण राहुल मोहन जाधव (रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव) हा गुरूवार 4 ऑगस्ट शुक्रवार रोजी मेहुणबारे येथे साप्ताहिक बाजार असल्याने विक्री साठी लागणारे इलेक्ट्रॉनिक चे होलसेल साहित्य घेण्यासाठी चाळीसगाव येथे आज बुधवार 3 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास काळी पिवळी वाहनातुन सिग्नल पॉइंटवर उतरताच 5 ते 6 तरूण त्याठिकाणी आले व राहुल यास काही कळण्याच्या आत त्यांनी घेराव घालुन मारहाण करायला सुरुवात केली. राहुल त्यावेळी त्यांच्या विनवण्या करीत असल्याचे समजते मात्र त्यातील एकाने गुप्ती त्याचे छाती व पोटाच्या मध्ये मारुन त्यास जखमी केले. त्यावर पुन्हा गुप्तीचा दुसरा वार केला असता हातमध्ये केल्याने त्याची हाताची बोटे कापली गेली त्यानंतर आरोपी तेथून पळुन गेले.