चाळीसगाव हादरले : आधी पत्नीचा कुर्‍हाडीने वार करीत केला खून नंतर रेल्वेखाली झोकून देत पतीची रेल्वेखाली आत्महत्या

चाळीसगावातील धक्कादायक घटना : चिमुकली पाखरे मातृ-पितृ प्रेमाला मुकली

Husband also committed suicide under the train after killing his wife because she had a girl for the second time: incident in Chalisgaon  चाळीसगाव : दुसर्‍यांदा मुलगीच झाल्याच्या रागातून पतीने आधी पत्नीची कुर्‍हाडीचे घाव घालत हत्या केली नंतर स्वतःदेखील रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी घटना शहरात घडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुरज दिलीप कुर्‍हाडे (28) असे आत्महत्या केलेल्या पतीचे तर रेश्मा सुरज कुर्‍हाडे (24) असे मयत पत्नीचे नाव आहे.

पत्नी सासरी येताच कुर्‍हाडीने केली हत्या
धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा यांच्याशी तीन वर्षांपूर्वी सुरजशी विवाह झाला होता. तो पत्नी व मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगरात वास्तव्याला होता व मातीकाम करून रहाटगाडा ओढत होता. लग्नानंतर सुरजला पहिली मुलगी झाली मात्र त्याला मुलाची इच्छा होती तसेच त्याला दारूचे व्यसन होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण होत असे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसर्‍या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेल्या. तिला दुसरीही मुलगीच झाली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सुरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.

मुलगी झाल्याने वाद घालत केली हत्या
चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. बुधवार, 30 रोजेी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून खून केला. घटनेनंतर सुरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतांनाच काही वेळातच सुरजने तो राहत असलेल्या परीसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सुरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड (रा. जुनोने, ता.जि.धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीचा खुन व पतीची आत्महत्या या घटनेने चाळीगाव शहर हादरले आहे तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेचा हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.