चासकमानच्या कालव्यास पाणी न सोडल्यास आंदोलन

0

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील चासकमानच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या गावांना पाणी मिळत नसल्यामुळे आज अनेक गावे तहानली आहेत. चासकमान विभागाने लवकरात लवकर पाणी सोडावे, पाणी न सोडल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अपंगांना आणि शेतकर्‍यांना घेऊन अन्नत्याग उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी दिला आहे.

पशूधन धोक्यात…

शिरूर तालुक्यातील चासकमान कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाणी मिळत नाही. तसेच पशुंना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली असल्याने पशुधन धोक्यात आले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यासाठी चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किसन फंड यांनी चासकमान विभागाकडे केली आहे.

आठ दिवसात कार्यवाही करा..

आठ दिवसांत चासकमान कालव्याला पाणी न सोडल्यास पुणे जिल्ह्यातील सुमारे 3 हजार अपंग आणि शेतकर्‍यांना घेऊन उपोषण करणार आहे, असे किसन फंड यांनी सांगितले आहे. यावेळी चासकमान विभागाचे उपविभागिय अभियंता रा. ज. भावसार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल जगताप, निलेश येवले, पांडुरंग तांबे, पंडित फंड यांसह आदी उपस्थित होते.