खेड । खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेले चासकमान धरण 100 टक्के भरले आहे. शुक्रवारी धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात 5990 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
चासकमान धरणाच्या पश्चिमेला आरळा नदीवर असलेले कळमोडी धरण हे सर्वात आधी म्हणजे 4 जुलैलाच भरले होते त्यामुळे प्रतिक्षा होती ती चासकमान धरण भरण्याची. कळमोडी धरण भरल्यानंतर त्यातून सुमारे 1500 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी चासकमान धरणात जमा होत असल्याने तसेच आठवडाभराच्या संततधार पावसामुळे चासकमान धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन ते अपेक्षेप्रमाणे वेळेत भरले.
सर्तकतेचा इशारा
धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 550 क्युसेक्स वेगाने तर पावरहाऊसद्वारे नदीपात्रात 300 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे. भीमा नदीला पूर आला आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाची दमदार हजेरी
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगरावर विशेषत: भीमाशंकर, भोरगिरी, खरोशी, मंदोशी, शिरगाव, भोमाळे, कहू, कोयाळी परिसरात मागील एक महिन्यापासून रात्रंदिवस जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी कळमोडी धरण 100 टक्के भरल्यामुळे धरणातील पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणात येत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.