चासकमान धरण 84 टक्के भरले

0

खेड : तालुक्याच्या पश्‍चिम भागात असलेले चासकमान धरण गेल्या आठवडाभराच्या संततधार पावसामुळे बुधवारी 84 टक्के भरले आहे. एकूण 8.51 टीएमसी क्षमता असलेल्या धरण 7.33 टीएमसी इतके भरले आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून शिरूर तालुक्यासाठी 550 क्युसेक्स वेगाने आवर्तन चालू असून नदीपात्रातूनही साधारण 300 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. तथापि कालव्यातून आवर्तन होत असले तरी खेड तालुक्याच्या पश्‍चिम भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर चार-पाच दिवसांतच धरण 100 टक्के भरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पावसाचे प्रमाण आणि पाण्याच्या वाढत्या पातळीचा अंदाज घेऊनच नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेणार असून त्याबाबत धरणाखालील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

वाडामार्गे भिमाशंकरला जाताना चासकमान धरण लागते तसेच धरणक्षेत्र ते भिमाशंकर हा परिसर निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे धरणाच्या आसपास पावसाळ्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते, ही गर्दी श्रावण महिन्यात सर्वाधिक असते. त्यामुळे पर्यटकांबाबत कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून धरण परिसरावर बारकाईने नजर असल्याचे तसेच त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेत असल्याचे उपअभियंता अशोक मुरडे तसेच कर्मचारी रोहिदास नाईकडे व बाबाजी कडलक यांनी सांगितले.