चाहुल गणरायाच्या आगमनाची…

0

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी रेल्वे, एसटी, लक्झरी, खासगी चारचाकी गाड्या सज्ज झाल्या आहेत. सर्वचजण आप-आपल्यापरीने बाप्पाच्या उत्सवासाठी तयारी करत आहते. मुंबई आणि उपनगरांत पावसाच्या सरी कोसळत असतानाही बाप्पाच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. एरव्ही व्हॉटस अ‍ॅप आणि आपल्या कामांत व अभ्यासात व्यस्त असणारी तरूण मंडळी आता गणेशोत्सवसाठी बैठका घेत आहेत. दुसरीकडे, चाकरमान्यांचीही गावच्या उत्सवसाठीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. येथूनच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. बाजारात बाप्पाच्या आकर्षित करणार्‍या मूर्त्या, ढोल-ताशा पथकांचा सराव, गणपतीसाठी कोकणात जाणार्‍या गाड्यांचे रिझर्व्हेशन मिळवण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ यामुळे सार्‍यांनाच बाप्पाच्या आगमनाचे वेध लागते.

सध्या चाकरमानी व्यस्त आहेत ते कोकणात जाणार्‍या गाड्यांचे रिझर्व्हेशन करण्यामध्ये. पूर्वी एसटीने जाणार्‍या चाकरमान्यांसाठी आता अनेक पर्याय खुले झाले आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे, कोकण रेल्वे. बाप्पाच्या उत्सवापासून तीन महिन्यांअगोदरपासूनच चाकरमान्यांना कोकण रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी घाई करावी लागते. यंदा तर उन्हाळी सुट्टीमध्ये गणपतीसाठीच्या तिकिटांची बुकिंग करावी लागली. चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेला पहिली पसंती असते. यामुळे कोकण रेल्वेही त्यांच्या प्रवाशांना नाराज न करता जादा गाड्यांची सुविधा पुरवते. परंतु, गणपतीमध्ये कोकणात जाणार्‍यांची संख्या इतकी असते की, कोकण रेल्वे चाकरमान्यांना तोकडी पडू लागते. अशा वेळी खासगी बसगाड्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी पुढे येतात. आज मुंबईत अनेक खासगी लक्झरी बस गाड्या मुंबईमधून कोकणात जातात. खासगी बस गाड्यांमध्ये सीट बुक करण्यात जरा जरी उशीर झाला तरी, त्यामध्येही रिझर्व्हेशन मिळणे कठीण बनते. आज मुंबईसह उपनगरांतूनही कोकणात जाणार्‍या खासगी बस गाड्या सुटतात. विरारच्या टोकापासून ते भांडूप-डोंबिवली येथून बसगाड्या सुटत आहेत. मुंबईतून बोरिवली आणि विशेष करून परळ विभागातून कोकणात जाणार्‍या बसगाड्या मिळतात. ज्या चाकरमान्यांकडे खासगी बसगाड्यांचे रिझर्व्हेशन असते, ते आपले सामान घेऊन परळ येथून गाड्या पकडून कोकणात दाखल होतात. या सगळ्यांमध्ये भाव खाऊन जाते ती म्हणजे, सर्वांची लाडकी एसटी. ग्रामीण भागात धावणारी एसटी चाकरमान्यांना कोकणात त्यांच्या गावात घेऊन जाते. त्यामुळे एसटीला आजही तितकीच पसंती दिली जाते. रेल्वे तुम्हाला कोकणाच्या शहरात सोडेल, खासगी बस तुम्हाला तालुक्यात सोडेल पण एसटीही तुम्हाला तुमच्या गावात घेऊन जाते. त्यामुळे आजही चाकरमनी एसटीमधून आपले गाव गाठत आहेत. ज्यांचे गाव कोकणात तालुक्यापासून लांब आहे. त्यांना एसटी त्यांच्या घरी सोडते. एसटीचेही गणपतीचे रिझर्व्हेशन लवकरच सुरू होणार आहे. आज मुंबईत असे अनेक चाकरमानी आहेत, ज्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत राहते आणि कोकणातल्या आपल्या घरात गणपती उत्सव साजरा करण्यासाठी ते खास कोकणात जातात. यांच्यासाठी गणपती उत्सवाची तयारी मुंबईच्या बाजारपेठेत सुरू होते आणि संपते कोकणातल्या बाजारपेठेत. म्हणजे, संपूर्ण कुटुंब मुंबईत राहत असल्यामुळे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची खरेदी मुंबईमध्ये केली जाते.

यावेळी, खरेदीची विविध जबाबदारी कुटुंबांच्या सदस्यांमध्ये वाटली जाते. तरूण मुले-मुली डेकोरेशनचे सामान आणणार, घरातील स्त्री पुजेच्या साहित्य खरेदीची जबाबदारी संभाळणार. कुटुंबातील प्रमुख कोकणात जाऊन गावी आपल्या नेहमीच्या गणेशमूर्तीकारकडे बाप्पाची मूर्ती बुक करणार आणि घर इतके दिवस बंद असल्यामुळे काही दिवस अगोदर जाऊन घराची साफ-सफाई करणार. अशा जबाबदार्‍या वाटून दिल्या जातात. यामध्ये आभुषणे किंवा डेकोरेशनचे काही नवीन साहित्य मार्केटमध्ये आले असेल, तर त्याचीही खरेदी मुंबईच्या मार्केटमधून केली जाते. खरेदीमध्ये गंमत अशी की, या सर्व खरेदीसाठी एकच दिवस ठरवला जातो. आणि एकाच दिवशी सर्व काही साहित्य बाजारपेठेतून खरेदी केले जाते. यावेळी दादर मार्केटला जास्त पसंती दिली जाते. सर्व सामान खरेदी केल्यानंतर खासगी चारचाकी गाडी बुक करून कोकण गाठले जाते. त्यानंतर काही सामान चुकले असेल तर, किंवा राहिलेले छोटे-मोठे सामान कोकणात जाऊन खरेदी केले जाते. बाप्पाच्या आगमनाची अशी तयारी झाल्यानंतर दुसरीकडे, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारीही जोरदार सुरू असते. सार्वजनिक गणेशोत्सव पाहायचा असेल तर, मुंबईमध्ये जाऊनच बघावा, असे आपण आज मुंबईबाहेर गेलो की, हमखास सांगतो. कारण मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारीच तशी सुरू असते. आज मुंबईमध्ये अनेक मोठे गणपती मंडळं आहेत. मुंबई उपनगरांतही मंडळाची संख्या अधिक आहे. आज मुंबई व उपनगरांत प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या पसंतीचे मंडळ असते. दरवर्षी नागरिक आपल्या पसंतीच्या मंडळाला उत्सव दरम्यान भेट देतात. कोणाला सजावट आवडते तर, कोणाला बाप्पासाठी उभारलेले भव्य मंडप. बाप्पाची मूर्ती तर सर्वांनाच आकर्षित करत असते. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, अंधेरीचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडीचा राजा, भंडारकरचा राजा, जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सव, चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती, कामाठीपुराचा चिंतामणी गणेश, तुलसीवाडीचा महाराज, डोंगरीचा राजा, चंदनवाडी गणपती ही मंडळं गणपती उत्सवाचे मुंबईमधील खास आकर्षण मानली जातात.

अमित राणे – 8087173768