चिंग्यासह साथीदाराला पोलिसांनी कारागृहातून घेतले ताब्यात

0

कारागृहाबाहेर येवून केली होती मारहाण

जळगाव : न्यायालयीन तारखेवर असताना कारागृहात बाहेर आल्यानंतर तुकारामवाडीत जाऊन अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी चिंग्या उर्फ चेतन आळंदे व त्याचा साथीदार गोलु उर्फ लखन दिलीप मराठे या दोघांना मंगळवारी न्यायालयाच्या आदेशाने कारागृहातून ताब्यात घेतले. रविवावरी याप्रकरणी तीन पोलिसांना अटक झाली असून त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चिंग्या व गोलु हे दोन्ही खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. त्यांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने सोमवारी सायंकाळी पोलिसांचा अर्ज मंजूर केला. मंगळवारी पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन कारागृह गाठले. सायंकाळी चिंग्या व गोल्या या दोघांचा ताबा घेऊन अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. 13 जून रोजी न्यायालयात तारखेवर असताना चिंग्या व गोलु हे दोन्ही जण न्यायालयातून थेट कारागृहात न जाता मुकेश आनंदा पाटील या गार्ड ड्युटीवरील पोलिसाला सोबत घेऊन अरुण भिमराव गोसावी यांना मारहाण करुन कारमध्ये डांबून ठेवले होते. या प्रकरणी चेतन आळंदे, गोलु उर्फ लखन दिलीप मराठे, हवालदार मुकेश पाटील, सुरेश सपकाळे व कॉ. गोरख पाटील यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.