मुंबई | यंदा 98 व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ म्हणून प्रसिद्ध असणारा बाप्पा बाहुबली चित्रपटाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या महिष्मती दरबारात विराजमान झाला आहे. ही 18 फूटी मूर्ती प्रसिद्ध दिवंगत मुर्तिकार विजय खातू यांनी साकारली असून नेपथ्य अमन विधाते यांनी केले आहे. तर वेशभूषा प्रकाश लहाने आणि प्रकाश योजना विशाल भुजबळ यांची आहे.
गिरणगावातील शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना 1920 साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. फक्त गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या धार्मिक उत्सवा पुरतेच् मर्यादित न राहता मंडळाचे वाचनालय,सुसज्ज ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, आरोग्य दवाखाना तसेच इंग्रजी किलबिल नर्सरी हे उपक्रम वर्षभर सुरू असतात.
चिंतामणीचा आगमन सोहळा मुंबईत विशेष प्रसिद्ध आहे. यावर्षी आगमन सोहळ्यामध्ये जवळ पास दोन ते अडीच लाख भाविक उत्साहपूर्वक वातावरणात सामील झाले होते. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील चिंतामणी भक्तांची गर्दी वाखाणण्याजोगी होती.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंडळाने व्यावसायिक पुरूष गटातील आणि महिला स्थानिक गटातील चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबईतील विविध मातब्बर संघानी भाग घेऊन कबड्डी ची शोभा वाढविली होती. त्याचबरोबर चिंतामणी दिनदर्शिकेचे उद्घाटन करण्यात आले होते.
दरवर्षी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ महाराष्ट्रातील एका खेडेगावात आरोग्य शिबिरासह मोफत औषध वाटपाचे काम करीत असते; परंतु या वर्षी पासून सदर आदिवासी पाडयामधे जावून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप तेथील कुटुंबियाना करण्याचा मानस मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भगवान हळदणकर यांनी व्यक्त केला आहे. मंडळाला उत्तरोत्तर प्रगतीपथाकडे नेण्याचा मानस मंडळाचे सचिव महेश पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.