पिंपरी-चिंचवड : चिंचवडगावातील मंगलमूर्तीवाडा परिसरात एका टोळक्याने गुरूवारी रात्री धुडगूस घालत 10 वाहनांची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा, मोटार, टेम्पोचा समावेश असून लाकडी दांडके, दगडाचा वापराचा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 संशयितांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मोटार, रिक्षा, टेम्पोंचे नुकसान
पहिल्या गुन्ह्यात विशाल दत्तात्रय भदे (वय 32, चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकी घोलप व त्याच्या सात ते आठ मित्रांनी परिसरात दहशत पसरविण्यासाठी परिसरातील 10 गाड्यांची तोडफोड केली. फिर्यादी यांनाही मारहाण करून त्यांच्याकडील पाच हजार रुपये काढून घेतले व परिसरातील गाड्यांचे मिळून दीड लाख रुपयांचे नुकसान केले. दुसर्या गुन्ह्यात विकी घोलप याने प्रशांत यादव, प्रवीण यादव, अक्षय काशीद, गोपी कुरलप, सचिन खोल्लम, निरंजन जगताप यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीतांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून फिर्यादी व मित्राला मारहाण केली.