चिंचवडच्या सोनाराला 20 हजारांचा गंडा

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड, शाहूनगर येथील रत्नप्रभा ज्वेलर्स या शोरुममधून एका अज्ञात इसमाने पोलीस असल्याची बतावणी करून 20 हजार 500 रुपयांचे दागिने खरेदी केले. खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे त्याने धनादेश स्वरुपात दिले. मात्र, हा धनादेश खोटा निघाल्याने सोनाराची 20 हजार 500 रुपयांत आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी रत्नप्रभा ज्वेलर्सचे मालक नीलेश सोनार यांची भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, फसवणूक करणार्‍या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनादेशाविषयी शंका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश सोनार यांचे चिंचवड, शाहूनगर येथे रत्नप्रभा ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दागिने विक्रीचे शोरूम आहे. या शोरुममध्ये मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अज्ञात इसम आला. त्याने 20 हजार 500 रुपयांचे दागिने खरेदी केले व त्या बदल्यात त्याने रोख पैसे न देता धनादेश दिला. त्या धनादेशावर शंका घेतली असता, त्याने मी पोलीस आहे, अशी बतावणी केली. मात्र, प्रत्यक्षात बँकेत गेल्यावर तो धनादेश खोटा असल्याचे समोर आले. त्यामुळे सोनार यांची 20 हजार 500 रुपयात फसवणूक झाली. त्यानंतर सोनार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.