सावंतवाडी : चिंचवड येथे 26 व 27 एप्रिलला होणार्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेस नेते नारायण राणे भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे याच बैठकीत त्यांचा भाजप प्रवेश होईल, अशी दाट शक्यता आहे. राणे यांनी भाजप प्रवेशाबाबत आतापर्यंत टोलवाटोलवी केली होती; पण प्रथमच त्यांनी आपण 25 एप्रिलला भूमिका जाहीर करू, असे कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नारायण राणे हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग दौर्यावर आहेत. त्यांनी यादरम्यान कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली. पण राजकीय भाष्य करण्याचे टाळले होते. लातूर आणि राज्यातील अन्य निवडणुकांत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचे खापर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांवर फोडले होते. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काँग्रेसच्या कारभारावर ते सातत्याने प्रखर टीका करत आहेत.