चिंचवड : रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फे 17 ते 21 जानेवारी या कालावधीत शिशिर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. व्याख्यानमालेचे 21 वे वर्ष आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दररोज सायंकाळी सहा ते साडेआठ व्याख्यान होईल. सायंकाळी सहाला रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते होणार आहे.
वक्ते व विषय असे : दि. 17 : दिलीप सातभाई (बदलत्या अर्थकारणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम), दि.18 : चंद्रशेखर नेने (भारताचे सख्खे शेजारी-चीन आणि पाकिस्तान), दि.19 : चिन्मय मिशनचे स्वामी सिद्धेशानंद (ताणतणाव आणि अध्यात्म), दि.20 : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत, दि.21 : गीतकार प्रवीण दवणे (माझे लेखन एक आनंद यात्रा).
19 जानेवारीला योगिता मून यांना ‘सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. मून या रस्त्यावरील किंवा सिग्नलवरील बेवारस मुलांसाठी ‘शिक्षण ग्राम’ या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतात. यावेळी प्रौढ साक्षर झालेल्या 7 कामगार स्त्रियांचा सत्कार करण्यात येणार आहे. व्याख्यानमालेचे आयोजन क्लबच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी, सचिव भूपिंन्दरसिग जग्गी, प्रकल्प प्रमुख प्रसाद शेटे यांनी केले आहे.