चिंचवडमध्ये झाला गर्भवती महिलांचा अनोखा रॅम्प वॉक!

0

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्यावतीने ‘नया मेहमान’ ही थीम घेऊन राबविला रॅम्प वॉक शोचा उपक्रम

महिलांमध्ये आत्माविश्‍वास निर्माण करण्यासाठीच हा फॅशन शो

चिंचवडः पिंपरी-चिंचवड महानगरामध्ये अनेक गोष्टी नव्याने सुरू होत आहेत. जुन्या गोष्ठींबरोबर नवीन आणि आधुनिक विचारांचा पगडा आता सर्वत्र दिसून येत आहे. चिंचवमध्ये नुकताच अनोखा कार्यक्रम पार पडला. यामध्ये चक्क गर्भवती मॉडेलला सध्या सुरू असलेल्या या फॅशन सप्ताहात रॅम्पवर उतरविले आणि सर्वांचा वाहवा मिळविली. आता करियरच्या मागे पळणार्‍या महिलांना, मुलींना बाळंतपण नको वाटत असते. एकदा आई झालो की, करिअर बुडले, असा समज अनेक मुलींमध्ये दिसतो. त्यासाठीच आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्यावतीने नया मेहमान ही थीम घेऊन गर्भवती महिलांचा अनोखा रॅम्प वॉक शो आयोजित केला होता. गरोदर महिलांमध्ये फॅशनचा आत्मविश्‍वास निर्माण केला गेला. आई होणे किती आनंददायी असते, हेच यामधून सूचित करण्यात आले.

चिंचवड परिसरातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या ऑडिटोरिएममध्ये हा फॅशन शो आयोजित केला होता. या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री प्रियंका यादव, आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मुख्य व्यवस्थापक रेखा दुबे, उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेविका जयश्री गावडे, डॉ. राजशेखर अय्यर, सरीता बारणे आदी उपस्थित होते.

महिलांनी केले सुंदर कॅटवॉक
आता डिझायनर्सचा फॅशन शो म्हटला की त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यातील मॉडेलही खूप सुंदर असतात आणि आत्मविश्‍वासाने सहभागी होतात. अनेकदा लहान मुलांचा रॅम्प वॉक आयोजित केला जातो. पण हा रॅम्प वॉक गर्भवती महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी होता. अगदी नजाकतीने पावले टाकत रॅम्पवर कॅटवॉक करणार्‍या उंच, गोर्‍यापान, सुंदर तरुणी डोळयासमोर येतात. असेच चित्र आपण पाहतो. अशा फॅशन शोमध्ये चर्चा असते ती मॉडेलची आणि तिने नेसलेल्या वस्त्रांची. मात्र या रॅम्प वॉकमध्ये गर्भवती महिलांनी आपल्या कला सादर केल्या.

300 महिलांचा सहभाग
गर्भवती महिलांनी यावेळी रॅम्प वॉक करत या कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. या अनोख्या रॅम्पवॉकची फॅशन वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. गरोदर असूनही रॅम्पवर तेवढयाच ऐटीत आणि आत्मविश्‍वासाने उतरलेल्या या महिलांनी मॉडेलिंग संदर्भातील भ्रामक संकल्पना मोडीत काढल्या. या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून जहांगीर हॉस्पिटलच्या पी.आर. हेड आरती राणे, फेमिना पुणेच्या कोरिनिया मॅन्युअल, क्लिनिकल सर्व्हिसच्या मुख्य डॉ. सुजाता रावत यांनी काम पाहिले. या रॅम्प वॉकमध्ये 300 महिलांनी सहभाग घेतला.