पिंपरी-चिंचवड : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 24) 2 हजार 965 पदांसाठी जम्बो रोजगार मेळावा भरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नागरवस्ती विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र यांच्या माध्यमातून हा मेळावा भरणार आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते होणार आहे.
नामांकित कंपन्या सहभागी होणार
या रोजगार मेळाव्यासाठी पुणे, चाकण, भोसरी औद्यागिक क्षेत्रातील महिंद्रा, बजाज, भारत फोर्ज, कल्याणी मोटर्स, लुकास अशा 46 नामवंत कंपनी सहभाग घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्याद्वारे विविध पातळीवर प्रशिक्षण घेतलेले किंवा घेणारे लाभार्थी लाभ घेऊ शकणार आहेत.
दहावी ते पदव्युत्तर उत्तीर्ण उमेदवारांना संधी
या मेळाव्यासाठी पात्रता म्हणून किमान 10 वी व 12 वी पास, एमसीव्हीसी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा, बीई, ड्राइव्हर्स शिक्षण घेतलेले तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्याद्वारे विविध पातळीवर प्रशिक्षण घेतलेले किंवा घेणारे लाभार्थी पात्र असतील. त्यांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत. यावेळी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे.