चिंचवड-काळेवाडीला जोडणार्‍या पुलाचा भराव खचतोय!

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड आणि काळेवाडी या दोन परिसरांना जोडणारा पवना नदीवरील पुलाच्या चारही बाजुंचा भराव खचत चालला आहे. या पुलाच्या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष पुरविले नाही, तर भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळेवाडीच्या दिशेने या पुलाच्या दोन्ही बाजुला अनधिकृत भंगार व्यावसायिकांनी विळखा घातलेला आहे. त्यामुळे प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात पवना नदीत मिसळत असून प्रदूषणात वाढ होत आहे. या प्रकाराकडेही संबंधित विभागांनी लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

इकडे आड, तिकडे विहीर
चिंचवड आणि काळेवाडी या दोन्ही परिसरांना जोडणार्‍या पुलाच्या चारही कोपर्‍यांचा भराव खचत चालला आहे. या पुलाला जाळी बसविण्यात आल्याने नागरिक ओला व सुका कचरा या पुलाच्या खचलेल्या भागामध्ये टाकत अस्वच्छतेत भर घालत आहेत. तर महापालिकेचे मोडकळीस आलेले बाकही याच पुलाच्या कोपर्‍यांना फेकून देण्यात आले आहेत. चिंचवडच्या बाजुला असलेल्या मैदानाचा शौचविधीसाठी वापर करण्यात येतो. यासह रात्रीच्या वेळी या मैदानाचा काही दारुडे दारू पिण्यासाठी वापर करीत असतात. तर विविध प्रकारचे विक्रेते तेथे घाण सोडून जातात. काटेरी झाडेझुडपेही या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

भंगार व्यावसायिकांना आवर घाला
चारही बाजुला अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास, मच्छर व विविध आजाराच्या किटकांची उत्पत्ती झालेेली आहे. भरीसभर म्हणजे नदीत संचयित झालेले सांडपाणी, मैला, रसायनयुक्त पाणी व मोठ्या प्रमाणात फोफावलेली जलपर्णी आहेच. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूस राहणार्‍या रहिवाशांच्या सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यात भंगार विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने दिवसभर प्लास्टिकच्या पिशव्या परिसरात उडत असतात. सर्व घाण पवना नदीत टाकण्यात येत असते. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूने अकरा बळी घेतले आहेत. महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असून अशा प्रकारे प्रदूषण व अस्वच्छता पसरवणार्‍यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.