अतिक्रमण कारवाईला नागरिकांचा विरोध
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने अतिक्रमण विभागाने चिंचवड गावातील अनधिकृत दुकानांवर कारवाई केली. रस्त्यात अडथळा ठरणार्या भीमनगर भागातील दहा ते बारा दुकाने, टपर्या व पत्राशेड पाडण्यात आले. या कारवाईला स्थानिक नागरिक व दुकानदारांनी विरोध केला. त्यामुळे याभागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कै. शहिद अशोक कामठे बस थांब्यासमोरील रस्त्यावर अडथळा दुकानांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने सुरवात केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने तणाव निवळला.
महापालिकेने ही कारवाई करणार असल्याचे येथील व्यावसायिकांना नोटीशीद्वारे सांगितले होते. स्थानिकांनी ही जागा खाजगी असल्याने संबंधित व्यक्तींशी चर्चा करून कारवाई करायला हवी होती अशी भूमिका घेतल्याने वाद वाढत गेला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते करत होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. चुकीच्या पद्धतीने कारवाई करणार्या अधिकार्यांना निलंबित करा अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करीत होते.
चर्चा करणे महत्वाचे
सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जगताप म्हणाले की, ही कारवाई जाणीवपूर्वक केली जाते आहे. जागेबाबत पत्रव्यवहार सुरु असून जागा खाजगी संस्थेची असल्याने या कारवाईबाबत चर्चा करणे महत्वाचे होते. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.