अहवाल मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील उर्वरित निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत विस्तृत प्रकल्प आराखडा अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल मंगळवारी (दि. 11) स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेडसेपरेटरवर दापोडी हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोचे सुमारे 8 किलोमीटर अंतराचे काम चालू आहे. हा मार्ग थेट निगडीपर्यंत केला जावा, अशी मागणी नागरिकांसह, विद्यार्थी, कामगार व लोकप्रतिनिधींनी केली होती. तर मनसेने डीपीआर लवकरात लवकर सादर करण्याची मागणी केली होती. तसेच आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता.
मार्गावर तीन मेट्रो स्टेशन..
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला निगडीपर्यंत डीपीआर तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार महामेट्रोने आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मदतीने 6 महिन्यांच्या कालावधीत या मार्गाचा डीपीआर तयार केला आहे. हा डीपीआर महामेट्रोने 29 सप्टेंबरला आयुक्त हर्डीकर यांच्याकडे सादर केला. चिंचवड पूल ते भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचे अंतर 4.413 किलोमीटर आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी व भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असे 3 मेट्रो स्टेशन आहेत.
1 हजार 48 कोटी 22 लाख रुपये खर्च
निगडीपर्यंतच्या प्रकल्पाचे कामासाठी, भूसंपादनासाठी आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याकरीता एकूण 1 हजार 48 कोटी 22 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या डीपीआरला मान्यता देण्यासाठी तो अहवाल मंगळवारच्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या अंतिम मंजुरीनंतर डीपीआर महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या अंतिम मंजुरीनंतरच सदर मार्गाचे काम सुरू करता येणार आहे.