चिंचवड राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद; पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही !

0

पिंपरी : एबी फॉर्म न दिल्याने चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. आज शनिवारी ५ रोजी उमेदवारी अर्जची छाननी होती. या छाननीमध्ये शितोळे यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आल्याची निवडणूक आयोगाने माहिती दिली. मात्र या मागे राष्ट्रवादीकडून वेगळा डाव खेळला जातो आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूकीकरिता एकूण 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. प्रशांत कृष्णराव शितोळे यांच्यासोबतच शंकर पांडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनशाम परदेशी व प्रकाश भाऊराव घोडके या 5 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम 33 नुसार अवैध ठरविण्यात आले आहेत.

भोसरीमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही, पिंपरीत ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आणि त्यातच चिंचवडच्या उमेदवाराचा आता अर्ज बाद झाला. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची वाताहत सुरू झाल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसत आहे.