काहीही झाले तरी लढणार आणि जिंकणार; उच्चशिक्षीत नताशा (नितीश) लोखंडे
जनहित लोकशाही पार्टीचे पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
पिंपरी चिंचवड ः समोर उमेदवार कोणीही अन् कुठलाही असो, चिंचवड विधानसभेची निवडणुक लढणार आणि जिंकणार, असे म्हणत चिंचवड विधानसभा मतदार संघातून नताशा (नितीश) लोखंडे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. नताशा लोखंडे या उच्चशिक्षीत तृतीय पंथीय असून जनहित लोकशाही पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या न्याय, हक्कासाठी त्या चिंचवड विधानसभा मतदार संघातून लढणार असल्याची माहिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. विनोदराव मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद साळवी, महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब पाटोळे, जनहित कामगार महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज माने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब तिरकुंडे, युवक आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आसिफ शेख, निकिता मुख्यदल आदी उपस्थित होते.
हे उमेदवार लढणार निवडणुक…
निवडणुक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता जाहीर झाली केली असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जनहित लोकशाही पार्टीने देखील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवारांचे नावे जाहीर केले आहे. यामध्ये, पिंपरी विधानसभा – अशोक आल्हाट (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष), चिंचवड विधानसभा – नताशा (नितीश) लोखंडे (तृतीयपंथी उमेदवार), भोसरी – विश्वास गजरमल (प्रदेशाध्यक्ष, जनहित कामगार महासंघ), मावळ – संतोष चौधरी (राष्ट्रीय उपाध्यक्ष) हे उमेदवार निवडणुक लढणार आहेत.
सहानभुती नको, दर्जा मिळावा…
नताशा लोखंडे म्हणाल्या, घटनेत एलजीबीटींना 377 कलमाच्या दुरुस्तीमुळे या प्रगल्भ लोकशाही राष्ट्रात स्वतंत्र दर्जा मिळाला. 37 कलमाच्या दुरुस्तीमुळे एलजीबीटींना हक्क मिळाले. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. अजूनही आमच्या न्याय, हक्क मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेत खाते उघडणे, नवीन वाहन घेणे, घर घेणे, पासबूक, कर्ज मिळविणे, चरितार्थासाठी उद्योग व्यवसाय सुरु करणे, यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाच्या विकासाच्या अनेक योजना आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचल्या नाहीत. देशभर एलजीबीटींची संख्या लाखामध्ये आहे. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून खासदार लक्ष्मी त्रिपाठी संसदेत लढा उभारत आहेत. दिशा शेख, गौरी सावंत, सचिन वाघोडे, शायना पाटील, पंकज बोकील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करणार आहे. आपण स्वत: नताशा ( नितीश ) लोखंडे हॉटेल मॅनेजमेंटची पदवीधर असल्याचे सांगत व्यावसायिक पदवी मिळवून देखील आमच्यासारखे लाखो एलजीबीटी रोजगारापासून वंचित आहेत. चौका – चौकात भीक मागणे, छोट्या मोठ्या ऑकेस्ट्रामध्ये नाचगाण्याचे काम करणे, सेक्स वर्कर म्हणून पैसा मिळविणे, आयुष्यभर समाजाचे टक्के, टोमणे सोसत उतारवयात, अपंगत्व आल्यानंतर भेडसावणार्या सामाजिक व आरोग्याच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे. यातून तृतीय पंथीयांची सुटका व्हावी. यासाठी एलजीबीटींचे प्रश्न सक्षमपणे समाजापुढे मांडण्यासाठी व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले. आता आम्हाला सहानुभूती नको तर समाज दर्जा मिळावा, यासाठी लढा सुरु असल्याचे नताशा लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
प्रस्तापित राजकीय पक्षांशी दोन हात करणार….
राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आल्हाट म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून बहूजन समाज हा नेहमीच वंचीत राहिलेला आहे. अनेक सामाजिक व राजकीय विकासापासून समाजाला सामाजिक प्रवाहात आणणे, त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करणे, याकरिता जनहित लोकशाही पार्टीने सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही प्रस्थापित पक्षांना भीक न घातला हा पक्ष आपली भुमिका ठामपणे मांडत आहे. मागील चार वर्षात सतत जनतेच्या संपर्कात आहे. सामाजिक व राजकीय प्रबोधन करीत या पक्षाने राजकीय – सामाजिक घडामोडीचा बारकाईने अभ्यास केला आहे. निवडणूकीच्या रिंगणात उतरुन प्रस्तावित राजकीय पक्षांशी दोन हात करण्यास निर्णय घेतल्याने त्यांनी यावेळी सांगितले.