चिंचवलीत पोलिसांचा धुडगूस

0

कल्याण । कल्याणमधील नेवाळी अजूनही शेतकर्‍यांच्या आंदोलनाने धगधगत आहे. शेतकरी आणि पोलिस शुक्रवारी पुन्हा एकदा आमनेसामने आले. नेवाळीजवळच्या चिंचवली गावात रात्री 3 वाजता पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलिसांनी धुडगूस घातला. गावकर्‍यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्यांच्या काचा, गाड्या फोडल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. मात्र गावकर्‍यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.

नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरात शेतकर्‍यांचे उग्र आंदोलन केले. या आंदोलनाप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. या आंदोलनाची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही दखल घेतली असून त्यांनी गुरुवारी यासंदर्भातील संबंधित विभागाची बैठक बोलावण्यात आली होती.

मागण्यांकडे दुर्लक्ष
प्रस्तावित नेवाळी विमानतळामुळे 7 ते 8 गावातील शेतकर्‍यांच्या जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी याआधीही याप्रश्‍नावर आंदोलन केले होते मात्र सरकारने नेहमीच शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन चिघळल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

पोलीस बंदोबस्त कायम
नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसर येथे शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम राबवली आहे. या आंदोलनकर्त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची काही पथकेही शोधकार्याला लागली आहे. त्यामुळे अनेक जण भूमिगत झाले असून नेवाळी परिसरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. नेवाळीसह आजूबाजूच्या परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त कायम आहे. त्यामुळे येथील परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत होता.

सरकारचा हलगर्जीपणाः राधाकृष्ण विखे-पाटील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कल्याणातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी शेतकर्‍यांची भेट घेतली तसेच त्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनाही भेट दिली. नेवाळी प्रकरण हाताळण्यात राज्य सरकारने अक्षम्य हलगर्जीपणा केल्याची टीकाही त्यांनी केली. मुळातच राज्य सरकारने या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यात शेतकर्‍यांवर झालेला पॅलेट गनचा वापर म्हणजे एकप्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. तसेच शेतकर्‍यांशी चर्चा करून निश्‍चितपणे हा प्रश्‍न सुटला असता. मात्र राज्य सरकारकडून संवादच न झाल्याने गोळीबार करण्याची वेळ आली. मात्र येत्या पावसाळी अधिवेशनात आपण हा प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुन्हे दाखल असणार्‍या आरोपींना पकडण्यासाठी आमची पथके गावात गेली होती. मात्र असा कोणताही प्रकार आमच्या पथकाकडून झालेला नाही.
प्रताप दिघावकर, अप्पर पोलीस आयुक्त