यावल- तालुक्यातील चिंचोली येथील विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला. बालिकेला बकरीच्या पिल्लाने धक्का दिल्यानंतर उफाळलेल्या वादात वादात महिलेचा विनयभंग तसेच तिच्या सासूला मारहाण केल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी घडली. हाणामारीमध्ये फिर्यादी महिला बेशुद्ध झाली, त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिंचोली येथील पीडित 25 वर्षीय विवाहितेची मुलगी 5 नोव्हेंबरला सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत होती त्यांचे शेजारी तथा संशयित भूषण भानुदास कोळी, रेखा भूषण कोळी, मंगलाबाई भानुदास कोळी यांच्या बकरीच्या पिलाने पीडितेच्या बालिकेला धक्का दिला. त्यामुळे पीडितेने जाब विचारल्याने तीन संशयितांनी पीडितेसोबत वाद घातला. नंतर तिच्या घरात येऊन लाथाबुक्यांनी मारहाण आणि विनयभंग केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडितेच्या सासूलादेखील संशयितांनी मारहाण केली. हाणामारीत पीडिता बेशुद्ध पडली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी गुरूवारी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहेत.