चिंचोलीतील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल : तालुक्यातील चिंचोली येथील 21 वर्षीय तरूणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. ललित उर्फ लक्ष्या वासुदेव कोळी (21, रा.चिंचोली, ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
ललित कोळी हा आई-वडील व भाऊ यांच्यासह चिंचोली, ता.यावल येथे वास्तव्यास होता. सोमवार, 7 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता गुरांना चारा टाकून येतो, असे सांगून घरातून शेतात गेला असता रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध केला असता मिळून आला नाही. गावातील मयुर सुभाष कोळी हा मंगळवार, 8 फेब्रुवारी ललित कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेलर असता एका लिंबाच्या झाडाला ललित कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत यावल पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई मिराबाई, वडील वासूदेव अर्जून कोळी, भाऊ पंकज आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.