चिंचोलीत 28 हजारांचा मुद्देमाल लंपास

यावल : तालुक्यातील चिचोंली येथे पती-पत्नी झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अलगद लांबवली. निवृत्ती केशव बडगुजर (चिंचोली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचे लहान भाऊ महेश केशव बडगुजर एकत्र राहतात. मंगळवारी रात्री दोघे भाऊ आपापल्या खोलीत झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून शीतल बडगुजर यांच्या गळ्यातील 28 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. बुधवारी सकाळी कुटुंब जागे झाल्यानंतर गळ्यातील पोत कापलेली आढळली व पोतमधील सोन्याचे मणी आणी सोन्याचे पदक आढळून आले नाही तसेच मोबाईल, चांदीचे ब्रेसलेट दिसून आले नाही व घराचा दरवाजा उघडा आढळला. अज्ञात चोरट्याने घरात आतील कडी उघडून प्रवेश करीत 20 हजार रूपये किंमतीचे 4 ग्रॅम सोन्याचे मणी, मंगळसूत्र, तीन हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट व पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल मिळून 28 हजारांचा ऐवज लांबवला. यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहेत.