नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असतानाही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सलग नऊ दिवस दहा हजारांच्या आसपास वाढणारी संख्या शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहचली होती. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. गेल्या २४ तासांत दिवसभरात ११,४५८ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या यादीत आता भारत चौथ्या स्थानी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. १ लाख ५४ हजार ३३० रुग्ण बरे झाले असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपाचाराधिन आहेत. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने एक लाख करोनाबाधित रुग्णांची संख्या ओलांडली आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, प. बंगालमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.