केंद्रासह बहुतांश राज्यात भाजपची सत्ता आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेनेच ही सत्तेची सूत्रे भाजपकडे सोपवली. राज्यकारभार सोपवावा असा चांगला पर्याय दिसत नसताना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्या मोदींवर जनतेने भरवसा दाखवला आणि भाजपने बघता-बघता अनेक सत्ताकेंद्रे ताब्यात घेतली. मात्र, त्यानंतर भाजपने हम करे सो कायदा हे धोरण अवलंबल्याने भाजपबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यातच नोटाबंदी आणि जीएसटीचे फटके बसल्याने या नाराजीत आणखी वाढच झाली. भाजपच्या चौखुर उधळणार्या वारूचा वेग मंदावत असल्याचे संकेत प्राप्त होताच चिंताग्रस्त झालेले विरोधक ताकद एकवटून कामाला लागले आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे.
गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची गाजत असलेली भाषणे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पण, यातून जनतेचे काही भले होईल का? प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही भाजपची कोंडी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, नाराज नेते एकवटले आहेत. मात्र, यात आजही संभ्रमात टाकणारी भूमिका आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची. या पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठनेते शरद पवार यांच्या गूढ राजकीय डावपेचांमुळे त्यांच्याबद्दल नेहमीच संभ्रमाचे वातावरण असते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे एका आलिशान रिसॉर्टमध्ये चिंतन शिबिर घेतले. या दोन दिवसीय शिबिरात चिंतन कमी आणि स्वप्नरंजनच जास्त झाले. शरद पवारांना खूश करण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. त्यात कहर केला तो राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी. पटेल म्हणाले, 2019 हे वर्ष शरद पवारांचे असेल, या वर्षात पवार देशाचे पंतप्रधान होतील. पटेलांची ही भविष्यवाणी हास्यास्पदच होती. त्याबद्दल खुद्द पवारांनीच खुलासा केला तेही बरे झाले. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला राज्यातील जनतेने अव्हेरले. हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार निवडून आणतानाही राष्ट्रवादीची दमछाक झाली. असे असताना यापुढे कुणाच्या आधाराने शरद पवार पंतप्रधान होणार, हे मात्र पटेलांनी सांगितले नाही. चमत्कार झाला तरच पवार पंतप्रधान होऊ शकतात, इतके स्पष्ट असताना असे स्वप्नरंजन करून खरोखरच राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार आहेत का? राज्यात सध्या शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, कुपोषण, उद्योगधंद्यांमधील मंदी असे गंभीर प्रश्न आहेत. यावर पवार यांनी अपेक्षेप्रमाणे चिंता प्रकट करून चिंतन केले. मात्र, या चिंतन शिबिराच्या समारोपानंतर जाता-जाता पवार यांनी भाजपला पाठिंबा देणार नाही, शिवसेनेसोबतही जाणार नाही, आम्ही समविचारी पक्षांसोबत जाऊ, अशाप्रकारचे विधान करून भाजप-शिवसेनेतील वितुष्टाचाही राजकीय फायदा उचलत राजकीय भूमिकेबाबत संभ्रम कायम ठेवलाच. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला समस्त मतदारांनी घरचा रस्ता दाखवल्यानंतर काही तासांतच शरद पवार यांनी निकालांनतर भाजप सत्तेत येणार हे समजताच भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. मग, त्यावेळी भाजप हा राष्ट्रवादीला समविचारी पक्ष वाटला होता का? ज्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी हेच स्पष्ट झाले की, पुढील काळात राष्ट्रवादी एक चांगला विरोधीपक्ष म्हणूनही काम करू शकणार नाही.
भाजप आपल्या काही नेत्यांना विविध घोटाळ्यांत अडकवून ईडीसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून अडचणीत आणू शकतो हे राष्ट्रवादीला चांगले माहीत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात भाजप सध्या हेच सूडाचे राजकीय धोरण विरोधकांसाठी राबवत आहे. यातूनच राष्ट्रवादीचा भाजपविरोध कधी प्रेमाचे स्वरूप धारण करेल हे सांगता येणार नाही. यामुळेच सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल, अशी भीती शिवसेनेला वाटते. या भीतीपोटीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पवार यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आता या भेटीत काय घडले हे येणार्या काळात दिसेलच. देशात एकाधिकारशाही आहे, असे पक्षाच्या चिंतन शिबिरात म्हणणारे शरद पवार जेव्हा मोदींनाच तुझ्या गळा माझ्या गळा करतात तेव्हा जनता बुचकाळ्यात पडल्याशिवाय राहात नाही. राज्यात शेतकरी कर्जमाफी योजना पूर्णपणे फसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक सभेत निवडणूक प्रचारसभा असल्यासारखे ओरडून ऑल इज वेल असल्याचे सांगतात. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. नोकरी मिळत नाही म्हणून संतापलेल्या एका अपंगाने भरसभेत मुख्यमंत्र्यांवर पाण्याची बाटली भिरकावली. धनगर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले असता, क्या हुआ तेरा वादा हे गाणे वाजवून मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली गेली. मी लाभार्थी या शासकीय जाहिरातींमध्ये खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली. हे सर्व कशाचे निदर्शक आहे? सत्ताधारी इतक्या चुका करत असताना आणि त्याची झळ जनतेला बसत असताना विरोधक मात्र राजकीय खेळी खेळण्यात दंग आहेत. आज जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न गंभीर वळणावर आहेत. पण, यासंदर्भात विरोधकांनी केवळ दिखाऊ चिंता आणि चिंता न करता जनहिताचा प्रामाणिक विचार करत अतिशय गांभीर्याने कृती करावी.