चिंता परिवाराची नाही नवापूरकरांची

0

कठोर भुमिकाप्रसंगी खाकी वर्दीतला देवमाणुस गहिवरला

नवापूर (हेमंत पाटील) । शहराला कोरोनापासून बचाव करण्यासाठी नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व त्यांचे सहकारी, समस्त पोलीस अहोरात्र नवापूरकरांची काळजी घेऊन नागरिकांच्या बचावासाठी झटत आहे.

नवापूरकरांसाठी ते आपल्या घरी मुळगावी ही गेलेले नाहीत. घरात थांबा,सोशल डिस्टन ठेवा, मास्क लावा आपल्या नवापूरला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
देशात व राज्यात करण्यासारख्या महा भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून २१ दिवसाचे लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वात जास्त ताण पोलिसांवर येऊन ठेपला आहे.

त्याचबरोबर लॉकडाऊन परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये, म्हणुन कठोर भूमिका घेणारा पोलीस नावाच्या खाकी वर्दीतील देव माणूस गहिवरलेला दिसून येत आहे. संकटात असलेल्या निराधारांना आधार देण्यासाठी रस्त्यावर उतरून गरिब वसाहतीतील घरांमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व त्यांची टीम गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत. एमआयडीसीमध्ये असलेल्या कामगारांची कंपनीने हमी न घेतल्याने त्यांची उपासमार होत होती. अशावेळी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी त्यांना किराणा मालाची किट देऊन मदतीचा हात दिला आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे व माणसांनी माणसाकडे माणुसकीच्या धर्मातून पाहण्याची हीच वेळ आहे. या स्थितीत गोरगरिबांची हेळसांड होऊ नये म्हणून पोलीस व अनेक सामाजिक संघटना पुढे येत आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या संकल्पनेने व अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लाँकडाऊन काळात चांगले कार्य करत आहेत. कधी कठोर भुमिका व वेळप्रसंगी गरजूंना मदतीचा हात देऊन खाकी वर्दीतील देव माणूस दिसून येत आहे.

नवापूर शहराची काळजी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत घेत असून शहराच्या चारी बाजूला नाकेबंदी करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तीची चौकशी व तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर २४ तास शहरात फिरून त्यांनी सोशल डिस्टन्स व प्रशासनाच्या नियमाचे पालन करण्याचे आव्हानही करत आहे. त्याचबरोबर आपल्या पोलीस बांधवांची ही तेवढीच काळजी ते घेतांना दिसत आहे. हातात काठी घेऊन लोकांना घरात थांबण्याचे सांगत नवापूरकरांची काळजी घेणारे विजयसिंग राजपूत व त्यांचे सहकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे कार्य पाहुन समाधान व्यक्त होत आहे.