पुणे : नैऋत्य मोसमी वार्यांच्या हंगामात (मान्सून) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसर्या टप्प्यात देशात 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात कमी अधिक 8 टक्क्यांची तफावत शक्य असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. राज्यात पावसाने सध्या दडी मारली असून, त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. हा अंदाज शेतकर्यांना सुखावणारा असून, त्यांच्या मनातील चिंतेचे ढग दूर करणारा आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, 15 ऑगस्टपासून उर्वरित राज्यात पाऊस सुरु होण्याचा शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पावसाच्या उघडीपने खरीप पिके धोक्यात
हवामान खात्याने प्रिन्सिपल कॉम्पेनट रिग्रेशन मॉडेल आणि मान्सून मिशन कपल्ड फॉरकास्टिंग सिस्टीम या मॉडेलच्या आधारे मान्सूनच्या दुसर्या टप्प्याचा अंदाज वर्तविला आहे. एल निनो, इंडियन ओशन डायपोल हे घटक सर्वसाधरण स्थितीत आहेत. यामुळे यंदा दुसर्या टप्प्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पावसात पडणारे खंड, वाढते ऊन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील खरिपाच्या पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला असताना, ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असून, यात कमी अधिक 9 टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकरीवर्गाचा जीवात जीव आला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचा जून महिन्यात दिलेला अंदाजही कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हवामान विभागाकडील नोंदीनुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात 1951 ते 2000 या कालावधीमध्ये देशात सरासरी 43.5 मिलीमीटर (हंगामातील एकूण पावसाच्या 49 टक्के) पाऊस पडतो.
मराठवाडा, विदर्भात मोठी तूट
1 जून ते 12 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात 289.6 मिलीमीटर (88 टक्के) पाऊस झाला आहे. यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा 30 टक्के तर विदर्भात सरासरीपेक्षा 28 टक्के तुटीचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे. मराठवाड्यात 279.6 मिलीमीटर (70 टक्के) विदर्भात 442.1 मिलीमीटर (72 टक्के), मध्य महाराष्ट्रात 493.2 मिलीमीटर (104 टक्के) तर कोकणात 2083.9 टक्के (96 टक्के) पाऊस पडला. ऑगस्टच्या सुरवातीपासून पावसाने ओढ दिल्याचे पावसाची टक्केवारी घसरली आहे.