आळंदी नगरपरिषद व केळगाव ग्रामपंचायतीच्या वादाचा परिणाम
चिंबळी : येथील आळंदी-केळगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्याजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचर्याचा मोठा ढीग साचला आहे. हा कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. ओढ्याच्या अलीकडे आळंदी नगरपरिषदेची तर पलीकडे केळगाव ग्रामपंचायतीची हद्द आहे. हद्दीच्या कारणावरूनच हा कचरा उचलला जात नसून, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चिंबळीतील ग्रामस्थांनी केला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
येणार्या-जाणार्या नागरिकांना नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. कचरा अनेक दिवसांपासून याठिकाणी साचला आहे. त्यावर पाऊस पडल्याने कचरा कुजला आहे. त्यामुळे मच्छर, डास, चिलटे यांची उत्पत्ती होत आहे. आळंदी नगरपरिषद व केळगाव ग्रामपंचायतीकडून केवळ हद्दीचा वाद घालून कचरा उचलण्यास टाळाटाळ सुरू आहे. नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या वादात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालू आहे. दरम्यान, यासंदर्भात वारंवार तक्रारी करुनही हा कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे चिंबळी ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष आहे. येत्या आठ दिवसात हा कचरा उचलला गेला नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. कचरा उचलून तो थेट आळंदी नगपरिषद तसेच केळगाव ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकू, असा इशारा आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी दिला आहे.