चिंबळी । खेड तालुक्यातील दक्षिण भागातील चिंबळी, निघोजे, मोई, केळगाव, सोळू, मरकळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघातदेखील घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ, वाहन चालकांकडून केली जात आहे.
साईडपट्ट्यांचा भराव खचला
कुरुळी-मरकळ जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. चिंबळीफाटा ते केळगाव-आळंदी, सोळू-धानोरे-मरकळ ते पाटीलवस्ती पिंपळगाव या रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. या रस्त्यांवरून ये-जा करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यांची अवस्था बिकट होती. त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने या रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यांचा भरावदेखील अनेक ठिकाणी वाहून गेला असल्याने अपघाताची भीती आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.