चिंबळी । खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील चिंबळी, मोशी परीसरातील शेतकरी वर्गाने रब्बी हंगामात घेतलेल्या ज्वारीच्या पिकाची काढणी सुरू केली आहे. कुरूळी परिसरातील चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, मोशी, माजगांव, डुडूळगाव भागातील शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग इतर पिकाची काढणी करून रब्बी हंगामातील घेतलेल्या ज्वारीच्या कांदा पिकाची काढणी सुरू केली आहे.
या परीसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या व गोदामे उभारली असल्याने या भागात शेतमजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. ज्वारीच्या पिकाची काढणी करण्यासाठी एकरी तीन ते चार हजार रूपये द्यावे लागत असल्याचे परिसरातील शेतकरीवर्ग सांगत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गहू व इतर पिकांना रोगराईचा फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.