चिंबळी : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची प्रचिती सध्या चिंबळी, माजगाव परिसरातील नागरिकांना येत आहे. कधीही वीजपुरवठा खंडित होणे, विजेच्या अनियंत्रित दाबामुळे सातत्याने विद्युत उपकरणांचे नुकसान होणे, वाढीव वीज बिले, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांची मनमानी अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या चिंबळी व माजगावकर त्रस्त झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याने विजेच्या अनियंत्रित दाबाची समस्या उद्भवली आहे. अतिरिक्त दाबामुळे कधी कधी तर विद्युत रोहित जळून जाते. घरगुती विद्युत उपकरणे जळण्याचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व समस्यांची नागरिकांनी अनेकदा तोंडी तसेच लेखी स्वरुपात महावितरण कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, महावितरण कंपनीचे अधिकारी तक्रारींकडे लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
समस्या सोडविण्याची मागणी
खेड तालुक्यातील दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. हा परिसर वेगाने विकसित होत आहे. परंतु, सध्या याठिकाणी विजेची समस्या उद्भवली आहे. विजेच्या समस्येमुळे चिंबळी, माजगाव परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पाणीपुरवठादेखील विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ वीज पुरवठ्याअभावी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांसोबत जनावरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने विजेची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उद्योगांनाही बसतोय फटका
विजेच्या समस्येमुळे येथील लहान-मोठ्या उद्योगांनाही फटका बसत आहे. विजेच्या समस्येमुळे उद्योगांच्या उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होत आहे. तासन्तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक व कामगार हवालदिल झाले आहेत. या समस्येमुळे अनेक कारखानदार आपल्या कामगारांना गरजेवेळीच कामावर बोलावत आहेत. त्यामुळे दररोजचा रोजभागदेखील निघत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. छोट्या उद्योजकांचे तर कंबरडेच मोडले आहे. चिंबळी व माजगाव परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे या परिसरातून विजेची मोठी मागणी आहे. महावितरण कंपनीने विजेची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकाच ठिकाणाहून वीजपुरवठा व्हावा
चिंबळी, माजगाव परिसराला कधी चाकण भागातून वीज पुरविली जाते. तर कधी मोशी भागातूनही वीज पुरवठा होतो. यामुळे त्याचा परिणाम येथील वीज पुरवठ्यावर होत आहे. एकाच ठिकाणावरून वीजपुरवठा सुरळीतपणे पुरविला जावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. गावठाण हद्दीत नेहमी वीजपुरवठा खंडित होतो. अतिरिक्त दाबामुळेच ही स्थिती ओढावली आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिक आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.