तळेगाव दाभाडे । जिच्या चिवचिवाटाने प्रत्येकाचीच सकाळ रम्य व्हायची अशी सगळ्यांची लाडकी चिऊताईची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. मात्र याच चित्रताईला आपल्या घरट्याकडे परत बोलवण्यासाठी अनाम प्रेम या परिवाराने पुढाकार घेतला आहे. या संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने चिऊताईसाठी घरटी ठेवत हा दिन साजरा केला आहे.
हा कार्यक्रम मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील तळेगाव दाभाडेतील एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडला. पक्षीतज्ज्ञ महेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना घेऊन परिसरात चिमण्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवण्यात आले. चिमण्यांच्या जन्मांपासूनची त्यांची होणारी वाढ याबाबत चित्रफीत दाखवण्यात आली. महेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची चिमणीच्या विषयावरील चित्रकला स्पर्धा आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी चिमण्यांसाठी घरटी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
ही घरटी शाळा परिसरात लावली जाणार आहेत. त्याप्रमाणेच अनाम प्रेम परिवाराच्या कार्यकर्त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली घरटीही यावेळी लावण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले. मोबाईलमधून निघणारी घातक किरणे, प्रदूषण यामूळे लहानग्यांच्या लाडक्या चिऊताईचे अस्तित्व कमी होत चालले आहे. त्यातच वाढणार्या फ्लॅट पद्धतीमुळे घरटी करण्यासाठी चिमण्यांनाही जागा शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे त्यांना नैसर्गिक पद्धतीने घरटी उपलब्ध करून देऊन त्यांची संख्या वाढवता येऊ शकते. त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उपक्रमांचे महत्त्व पटवून देण्यात आला. मागील 3 वर्षांपासून हा उपक्रम घेतला जातो.