चिकनचे पैसे दिले नाही म्हणून शाहुनगरात तुंबळ हाणामारी

0

जळगाव । शाहुनगरातील अंडा लॉरीवर (गाडीवर) रविवारी रात्री चाकू-सुर्‍या.. पातेले, झारे घेत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. दरम्यान, हाणामारी झाल्याची बातमी परिसरात पसरताच साईव्हिजन ते मशीदी पर्यंत जमाव रस्त्यावर जमला होता. यानंतर पोलिस गाड्याही आल्या मात्र, प्रकरण आपसात मिटल्याने याप्रकरणी पोलिसात कोणतीही नोंद नाही. दरम्यान, या शाहुनगर भागात रात्रभर चालणार्‍या अंडा गाड्यामुळे हाणामार्‍या, चाकू सुर्‍यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

अंडा गाडीवर रविवारी रात्री तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडताच धावपळ सुरू झाली. त्यातच रहिवाश्यांचा जमाव एकवटल्यावर पोलिस आले आणि नेहमी प्रमाणे जामाव पांगवला व घरी निघुन गेले. दरम्यान, शहरात नवीन पोलिस अधिक्षक, अप्पर अधीक्षक हजर झालेत. परिणामी शहरातील सर्व अस्थापना बंदची वॉर्निंग रात्री दहा वाजताच सायरन’ वाजवून केली जाते. साडे दहा अकरा पर्यंत सर्वच दुकाने, टपर्‍या असतील नसतील ते धंदे बंद होतात. संपुर्ण शहर बंद करणार्‍या पोलिसांकडून मात्र शाहुनगर बंद होत नाही, पुर्वीच अशांत असलेल्या शाहुनगर परिसराला चायनिज अंडा लॉर्‍या आणि गुन्हेगारांची गर्दी गोळा करणार्‍या स्पॉटची भर पडली आहे. हाणामार्‍या..चाकु हल्ले, हमरी तुमरीतून जातीय तेढ निर्माण करणार्‍या घटना नित्त्याच्या झाल्या आहेत. शहर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याची सामाईक हद्द असल्याने दोघंही पोलिस ठाण्याचे अधीकारी कर्मचारी हात झटकतात. घटना घडलीच तर कथित समाज सेवक पोलिसांचे मध्यस्थी दलाली’ करुन प्रकरण आपसात मिटवत असतात. दरम्यान, याप्रकरणी अनिस खान नईम भिस्ती, जाकीर बेग सरदार बेग, भुरा कुतुबुद्दीन शेख , आरीफ खान अजगर खान या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन ते तीन जण जखमी
रविवारी रात्री साईव्हिजन पोलिस लाईनच्या मध्ये रात्री उशिरा पर्यंत चालणार्‍या अंडा लॉरीवर तुंबळ हाणामारी झाल्याने दोन तीन जखमी झाले आहेत. रहिवाश्यांचा जमाव रस्त्यावर उतरला गर्दी गोंधळ मध्ये तब्बल दिड तास तमाशा सुरु असतांना पोलिसांना खबर मिळाल्याने जिल्हा पेठ, शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधीकारी दाखल झाले. जमाव पांगवुन रहिवाश्यांना घरामधे ढकलून एक दोघांना उचलत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे तक्रार देण्याचे सोपस्कर पार पडत असतांनाच प्रकरण आपसात मिटवण्यात आले.