पिंपळनेर । साक्री तालुक्यातील चिकसे येथील मागच्या आठवड्यात पाटगन व देगाव रस्ता शिवारात तीन पशुधन ठार केल्यानंतर रविवारी पहाटे गांगेश्वर शिवारातील जिरापूर येथील विनोद हासाराम खैरनार यांच्या गाईचे सहा- सात महिन्याचे वासरू वन्यप्राण्याने ठार केले. मागील दोन वर्षात बिबट्याने विनोद खैरनार यांचे गाईचे 2 वासरू ठार केल्याच्या घटनेनंतर खैरनार यांनी शेतातील गुरांचा वाड्याला वॉल कंपाऊंट केले होते. मात्र रविवारी सकाळी जेव्हा विनोद खैरनार शेतात गेले असता त्यांना वाड्याची जाळी तोडलेली व वासरुचा फडसा पाडल्याचे आढळून आले. त्यांचे भाऊ भटू खैरनार यांच्या मदतीने वासरू शोधले असता ते मक्याच्या शेतात प्राण्याच्या हल्ल्यात मृत झाल्याचे आढळले. मागील तीन वर्षात दोन्ही भावांचे चार पशुधन वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वॉल कंपाऊटची जाळी तोडून हल्ला
पिंपळनेर परिक्षेत्राच्या वन अधिकारी मिनाक्षी जोगदंडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा करण्यासाठी कर्मचारी पाठवत असल्याचे सांगितले. दरम्यान देगांव रस्त्यावर असलेल्या पोपट गवळी यांच्या दोन कोंबडी बिबट्याने फस्त केल्याचे गवळींनी सांगितले. तीन दिवसापुर्वी वाड्यातील शेळी खाण्यासाठी जाळी तोडण्याचा प्रयत्न करताना गवळी यांना जाग आली व त्यांनी आरडाओरड केल्यासने बिबट्या पळाल्याचेही त्यांनी सांगितले. वन्यप्राण्याला फटाक्याच्या आवाजाने पळविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. चिकसे परिसरात वनविभागाकडून वन्यप्राण्याचा बंदोबस्त केला जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.