पिंपळनेर । साक्री तालुक्यातील चिकसे येथे एका आठवड्यात पंडित आहिरे, उत्तमराव खैरनार व राजेंद्र ठाकरे या तीन शेतकर्यांचे पशुधन वन्यपशूने फस्त केल्याच्या घटना घडल्या. पशुधनावर वन्यपशूंच्या लागोपाठ झालेल्या हल्ल्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा लागोपाठ घडणार्या घटनांनंतरही वनविभागाकडून आवश्यक कारवाई व घटनास्थळावर जाऊन पंचनामा होत नसल्याने चिकसे ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतशिवारात राबणार्या शेतकरी व मजूरांवर हल्ला होऊ नये यासाठी चिकसे-जिरापूर ग्रामपंचायतीकडून वनविभागाला वन्यपशूचा बंदोबस्त करण्यासंबंधीचे निवेदन उपसरपंच संजय जगताप यांनी दिले.
देगाव रस्त्यावरील शिवारात तीन घटना शुक्रवारी 18 ऑगस्ट रोजी पहाटे पंडित आहिरे यांच्या पाटगन शिवारातील शेतात वाड्यात बांधलेल्या गाईच्या अडिच ते तीन वर्ष वयाच्या वासरूवर वन्यपशूने हल्ला करून पोट फाडून ठार केले. वनविभागाला घटनेची खबर दिल्यानंतर मृत पशुधन पंचनाम्यासाठी घटनास्थळीच राहू दिले. मात्र पंचनामा झाला नाही व त्याच रात्री पुन्हा त्या वन्यपशूने येऊन अर्धवट खाल्लेले वासरू ओढून नेले. यावरून त्याच परिसरात वन्यपशुचा संचार असल्याचे सिद्ध होते. म्हणून शेतात राहणार्या शेतकर्यांमध्ये वन्यपशूची भीती पसरली आहे. तत्पुर्वी त्याच शिवारात देगांव रस्त्याला लागून असलेल्या उत्तमराव खैरनार यांच्या गाईचा अडिच वर्षाचा गोर्हा दोन दिवसांपुर्वीच वन्यपशूने ठार केला. राजेंद्र ठाकरे या आणखी एका शेतकर्याचे त्याच शिवारात तीन महिन्याचे गाईचे वासरू वन्यपशूने ठार केले. शामनखडी शिवारातही वन्यप्राण्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची माहीती मिळाली.
पिल्लांसह दोन बिबट्याची शक्यता
पिलांसह नरमादी बिबटचा वावर असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती चिकसे गावापासून 1 कि.मी. अंतरावर देगाव रस्त्याला लागून असलेल्या शंकरराव माळी यांच्या ऊसाच्या शेतात दोन बिबट (नरमादी) पिलांसह वावरत असल्याचे शेतात मुक्कामाला असणार्या शेतमजूरांनी सांगितले. रात्र झाल्यानंतर ते डरकाळ्या फोडत बाहेर पडतांना त्यांनी पाहिल्याचे संजय जगताप यांनी सांगितले. या हिंस्त्र वन्यप्राण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून अंगणात शेकोटी पेटत ठेवल्याची जगताप यांनी माहिती दिली. शेतमजूरांवर हल्ला होऊ नये म्हणून वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी संजय जगताप यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.