पिंपरी : मित्रांसोबत बोलत उभा असलेल्या तरुणाचे कोयत्याचा धाक दाखवून पाच जणांनी अपहरण केले. चिंचवड येथे नेऊन त्याला मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. 6) दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली आणि रामनगर चिंचवड येथे घडला. सचिन बापू सोनवणे (वय 20, रा. चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अस्लम मुजावर, आकाश शिनगारे, तुषार भंडारी, योगेश लहाने, पवन लष्करे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरे वस्तीतून उचलले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती मधील साई मंदिराजवळ मित्रांशी बोलत उभा होता. अचानक पाच आरोपी दुचाकीवरून आले. सचिनला कोयत्याचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने दुचाकीवरून घेऊन गेले. चिंचवड मधील रामनगर येथे असलेल्या दाट झाडांमध्ये सचिनला नेऊन मारहाण केली. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपिंना अद्याप अटक करण्यात आली नाही. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.