समितीत कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष
पिंपरी चिंचवड : चिखलीतील बहुचर्चित संत तुकाराम महाराज संतपीठाबाबत स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीकडून संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे या समितीमधील सदस्यांची संख्या, महापालिका पदाधिकारी, अथवा बिगर राजकीय सदस्यांना स्थान मिळणार की नाही, हे स्पष्ट होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली परिसरात संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाविषयी समाजातील मान्यवरांना उत्सुकता आहे. संतपीठ समिती सदस्य निवडीबाबत झालेल्या बैठकीत संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्त हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष…
हे देखील वाचा
’ना नफा ना तोटा’ या तत्वावर कंपनीची स्थापना केली जाणार असून आयुक्त श्रावण हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीमार्फत महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. संतपीठासाठी स्थापन करण्यात येणार्या विशेष कंपनीकडून या संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये सदस्य निवडीचे निकष, त्यांची शैक्षणिक पात्रता, संख्या, कालावधी या सर्व बाबींचा समावेश केला जाणार आहे. कंपनीचे सेक्रेटरी सतीश लुंकड हे कंपनी नोंदणीकृत करणे व त्या अनुषंगिक कामकाज पाहणार आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येणार्या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली. कामासाठी येणार्या 45 कोटीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
1 हेक्टर 80 गुंठे जागेवर संतपीठ…
माध्यमिक शाळेसाठी आरक्षीत चिखली येथील 1 हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या आरक्षित असलेल्या जागेवर संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वस्तीगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. मात्र, या शैक्षणिक संस्थेला केंद्र सरकारच्या सीबीएसई अथवा राज्य सरकारच्या माध्यमिक विभागाची मान्यता घेण्यात येईल, याबाबत चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.