पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने टाळगाव, चिखली येथे संतपीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिका स्थायी समितीची गुरुवारी साप्ताहिक सभा पार पडली. अध्यक्षा सीमा सावळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विषयपत्रिकेवर 43 विषय होते. त्यापैकी तीन विषय प्रशासनाने मागे घेतले. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ हा उपक्रम राबविण्यात येणार होता. यासाठी यशोधन एंटरप्रायजेस, प्राधिकरण, पुणे या संस्थेकडील शिक्षकांना घड्याळी प्रती तास 450 रुपयेप्रमाणे मानधन देण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे.
चिखलीला सांप्रदायिक वारसा
भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा आणि वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले ’जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ टाळगाव, चिखली येथे उभारण्याचा संकल्प केला आहे. चिखलीला सांप्रदायिक वारसा लाभला असून, शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे.
नुयोग जबूवाणी यांची नियुक्ती
या कामासाठी निविदा प्रश्चात कामांवर दैनंदिन देखरेख ठेवणे, कामांची प्रगती, गुणवत्ता मोजणे, कामांची बिले तयार करणे तसेच विविध कार्यालयीन कामकाजासाठी विविध विभागात समन्वय साधण्यासाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी नुयोग शिवजी जबूवाणी यांची वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना निविदापूर्ण कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 2 टक्के व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 1.35 टक्के रक्कम अदा केली जाईल. या विषयाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.