पिंपरी : गार्डनमध्ये ओळख होवून प्रेमात अडवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. मुलाचे नाव आणि पत्ता अशी सविस्तर माहिती मुलीकडे नसल्यामुळे आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याबाबत मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर भा.द.वि.क. 376, बाल लैंगिक अत्याचार, अधिनियम 2012 क 3, 4, 6 (2) व 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गार्डनमध्ये भेटून झाली ओळख…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 16 वर्षाची आहे. ती थरमॅक्स चौकाजवळील गार्डनमध्ये फिरायला गेली होती. त्याठिकाणी अमितशी ओळख झाली. त्यानंतर दोघेजण भोसरीतील महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये भेटले. प्रेमाच्या आणाभाका मारून अमितने मुलीला जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला तिच्या घराजवळ सोडून अमित कायमचा पसार झाला. मुलीच्या आईला संशय आल्याने ससून रुग्णालयात नेवून तिची तपासणी केली. त्यावर मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आईने लागलीच पोलीसांत धाव घेतली. मात्र, मुलीकडून संबंधीत मुलाचे नाव आणि पत्ता अशी सविस्तर माहीत मिळत नसल्यामुळे पोलिसांसमोर तपास करण्यात अडचणी येत आहेत. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.