महापालिका प्रशासनाची ‘डोळ्यावर पट्टी’
पिंपरी-चिंचवड : गेल्या 20 वर्षांपूर्वी महापालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेल्या चिखली, कुदळवाडी व मोशीतील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात भंगाराची दुकाने, गोदाम तसेच रसायनाचे कारखाने असल्यामुळे येथे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. भंगार व्यावसायिकांकडून परिसरात दररोज प्लास्टिकचा कचरा, भंगारातील स्क्रॅप मटेरिअल जाळले जाते. त्यातून निघणार्या अपायकारक धुरामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत. त्यातच या परिसरातील दुकाने व गोदामांना आग लागण्याचा घटना सातत्याने घडत असल्याने येथील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. येथील बेकायदा भंगार व्यवसायाविरुद्ध स्थानिकांनी अनेकदा महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या. परंतु, ढिम्म प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या परिसरात असलेली सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक भंगार व्यावसायिकांची दुकाने व गोदामे ही अनधिकृत आहेत. बोटावर मोजता येतील; एवढे भंगार व्यावसायिक सोडले तर इतरांकडे व्यवसायाचा परवाना (शॉपअॅक्ट लायसन्स) नाही. अनधिकृतपणे हा प्रकार सुरू असताना महापालिकेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. रहिवासी झोन असताना त्याठिकाणी ही दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. या दुकानांना महापालिकेने परवानगी दिलीच कशी? असा प्रश्न आहे. कुदळवाडीतील एका गोदामाला शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या घटनेनंतर चिखली, कुदळवाडी आणि मोशीकर पुन्हा दहशतीखाली आले आहेत.
अनेक वर्षांपासूनची समस्या
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये येणारा चिखली, मोशीतील कुदळवाडी, जाधववाडी, बोराटेवस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. कुदळवाडी-मोशी परिसरात दररोज भंगार व्यावसायिकांकडून रसायनमिश्रित कचरा आणि प्लास्टिक जाळण्यात येते. पहाटे आणि रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पोतून कचरा आणून येथे टाकला जातो. नंतर हा कचरा जाळला जातो. त्याचबरोबर रसायनमिश्रित पाणी सरळ इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे हवा आणि पाण्याचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे इंद्रायणी नदीतील जलचरांच्या तसेच नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. चिखली व कुदळवाडी भागात होणार्या हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाबाबत काही नागरिकांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे सातत्याने तक्रारी केल्या. परंतु त्याबाबत कोणत्याही स्वरुपाची कारवाई झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून यासंदर्भात सतत पाठपुरावा केला जात असताना महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.
95 टक्के व्यवसाय अनधिकृत
कुदळवाडीत सुमारे दीड हजार भंगार मालाची गोदामे व दुकाने आहेत. त्याचबरोबर रसायनाचे प्लास्टिकचे बॅरल विक्रीची दुकाने, लाकडी वखारीदेखील याठिकाणी आहेत. महापालिकेच्या पाहणी अहवालानुसार येथील 95 टक्के व्यवसाय अनधिकृत आहेत. प्लास्टिक व थर्माकोल मोल्डिंग, वायर जाळून तांबे काढणे, प्लास्टिकची वर्गवारी करणे असे प्रकार या परिसरात सर्रासपणे चालतात. त्यातून निघणारा प्लास्टिक व थर्माकोलचा कचरा परिसरात फेकला जातो. तर रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणीच्या पात्रात सोडले जाते. चाकण व भोसरी औद्योगिक वसाहतीतून निघणारा कचरा व रसायनदेखील विघटनासाठी याच परिसरातून आणून टाकला जातो. यासंदर्भात तक्रारी वाढल्याने मध्यंतरी महापालिकेच्या अधिकार्यांनी परिसरात पाहणीचा सोपस्कार पार पाडला. परंतु, बेकायदा व्यवसाय करणार्यांवर कारवाई झालीच नाही. त्यानंतर हा विषय मागे पडला.
सातत्याने घडतात आगीच्या घटना
चिखली, कुदळवाडी, मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगाराची दुकाने, लाकडी वखारी, रसायनाचे लहान-मोठे कारखाने आहेत. त्यामुळे याठिकाणी सातत्याने आगीच्या घटना घडत असतात. ही दुकाने एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असल्याने त्याठिकाणी अग्निशामक बंब वेळेत पोहचत नाही. त्यामुळे जर एखाद्या दुकानाला आग लागली तर ती क्षणातच भडकते. ही आग पाच ते सहा दिवस धुमसत राहते. चिखलीकडून मोशीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर सर्वाधिक भंगाराची दुकाने व लाकडी वखारी आहेत. उन्हाळ्यात याठिकाणी सर्वाधिक आगीच्या घटना घडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. ही सारी दुकाने अनधिकृत असतानाही महापालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून त्यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली जात नाही. त्यामुळे या व्यावसायिकांचे आणि प्रशासनातील अधिकार्यांचे साटे-लोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सार्या प्रकाराला राजकीय लोकप्रतिनिधींचे पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे.
‘रेसिडेन्स झोन‘मध्ये इंडस्ट्रियल युनिट
चिखली व मोशी या परिसराला ‘रहिवासी झोन’ म्हणून परवानगी देण्यात आली आहे. परंतु, या परिसरात प्लास्टिक पावडर बनविणे, प्लास्टिकचा कच्चा माल तयार करणे, फर्निचर बनविणे, रबर मोल्डिंग, वाहनांचे सुटे पार्टस् बनविणे, लोखंडी पाईप व पत्रे तयार करणे, अशा प्रकारचे उद्योग चालतात. रसायन निर्मितीचेही अनेक उद्योग येथे आहेत. त्यातून निघणारे खराब रसायन व रसायनमिश्रित पाणी याच परिसरात खड्डे करून किंवा थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या परिसरात चालणार्या उद्योगांमधून हवेच्या सोबत बाहेर पडणारे ‘मेटल पार्टिकल’ व ‘मेटल डस्ट’ (लोखंडी सुक्ष्म कण) श्वसनाद्वारे नागरिकांच्या शरीरात जातात. मेटल डस्टचा जाड थर इमारतींच्या भिंतींवर साचलेला दिसून येतो. या घातक प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी नागरिक तोंडाला रुमाल बांधूनच बाहेर पडतात.
रहिवासी सोसायट्यांना विळख्यात
चिखली, मोशी परिसरात नव्यानेच निर्माण झालेल्या सुमारेे 60 ते 70 प्रशस्त रहिवासी सोसायट्यांना प्रदूषणाचा फटका बसत आहे. या सर्व सोसायट्या चिखली-मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे या फेडरेशननेदेखील प्रदूषणाच्या बाबतीत महापालिका प्रशासनाने सातत्याने तक्रारी केल्या आहेत. परंतु अजूनपर्यंत महापालिकेने याविषयाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
भावी पिढीला सर्वाधिक धोका
चिखली व मोशी परिसरात स्थायिक झालेल्या नागरिकांमध्ये 25 ते 35 आणि जास्तीत जास्त 40 वयोगटातील नागरिकांची संख्या अधिक आहे. सुमारे 20 ते 25 हजार नागरिक या परिसरात राहतात. या वयोगटातील म्हणजेच, तरुणवर्ग येथे मोठ्या प्रमाणात राहतो. याच वयोगटातील पिढी ही, दुसर्या नव्या पिढीला जन्म देणारी पिढी मानली जाते. धुरामुळे होणार्या प्रदूषणाचा या पिढीवर विपरित परिणाम होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. गर्भवती महिला, लहान मुले तसेच नवजात मुलांना या प्रदूषणाचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे वेळीच हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना झाल्या नाहीत तर मोठा अनर्थ भविष्यात होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
न्युमोनिया, दमा, कॅन्सरची भीती
चिखली व मोशीत सद्यस्थितीत होत असलेल्या प्रदूषणामुळे येथील स्थानिक नागरिकांना न्युमोनिया, दमा व कॅन्सर अशा भयंकर आजारांची भीती आहे. या परिसरात दररोज सकाळी व रात्रीच्या वेळी प्लास्टिक, मेटल, थर्माकोल, थर्मल पेपर असे साहित्य जाळले जात असल्याने त्यातून मानवी शरीराला अपायकारक असणारा धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. या धुराची घनता जास्त असल्याने त्यातून अपाय लवकर होण्याची खूप भीती असते. मेटलच्या ज्वलनातून अमोनियम क्लोराईड तर प्लास्टिकच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड असे घातक वायू बाहेर पडतात. हवेद्वारे ते थेट मानवी शरीरात जातात. अमोनियम क्लोराईड व कार्बन डायऑक्साईड हे घातक वायू मानवी शरीरातील फुफ्फुसावर थेट परिणाम करतात. त्यामुळे न्युमोनिया, दमा व कॅन्सरचा धोका असतो. लहान मुले, गर्भवती स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्यांना हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असतो.