मुक्ताईनगर। चिखली गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल गजानन समोर असलेल्या मोकळ्या जागी झोपलेल्या एका इसमास भरधाव वेगाने येणार्या टँकरने चिरडुन जागीच ठार झाल्याची घटना रविवार 30 रोजी सकाळी 11.53 वाजता घडली. घटनास्थळावरुन टँकरचालक फरार झाला असून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात याबाबत टँकरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरचालकाविरुध्द गुन्हा दाखल
चिखली गावाजवळ नॅशनल हायवे क्रमांक 6 वरील हॉटेल गजानन समोरील मोकळ्या जागी झोपलेल्या अरविंद लक्ष्मण टोंगळे (वय 44, रा. चिखली) या इसमास टँकर क्रमांक एमएच 15 बीजे 9790 या वाहनाने चिरडुन अरविंद जागीच ठार झाल्याची घटना रविवार 30 रोजी सकाळी 11.53 वाजता घडली. येथील हॉटेल गजाननचे बांधकाम सुरु आहे. या हॉटेल समोरील मोकळ्या जागेत झोपलेले असताना टँकरवरील चालकाने हॉटेलकडे नेऊन खाली झोपलेल्या अरविंद टोंगळे यांच्या अंगावर व डोक्यावर गेल्याने ते जागीच मरण पावले. दरम्यान या अपघातामुळे परिसरात जमाव जमा झाल्यामुळे जमावाच्या संतप्त भावना लक्षात घेता भितीपोटी पळ काढला. सदर घटनेबाबत गजानन महादेव टोंगळे यांच्या फिर्यादीवरुन टँकरचालकाविरुध्द मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तपास पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माणिक निकम
करीत आहे. दरम्यान या परिसरात अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम अनेकांना आपले जीव गमावावे लागले असून या परिसरात वाहतुक नियंत्रण पोलीसांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. तसेच अपघाताच्या घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना वेळेवर मदत मिळण्याच्या दृष्टीने पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्याची मागणी देखील परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.