चितोड्यात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

यावल । तालुक्यातील चितोडा येथील अनेक कालावधीपासून गावातल्या गावठाण परिसरात सांडपाण्याचे डबके व घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. देशात एकीकडे भारत स्वच्छ अभियान राबविले जात असून गावागावात स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. परंतु याठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता मोहिम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणची दखल कोणत्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य घेत नसल्याने, ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता
गावातील पाण्याच्या टाकीमधून होत असलेला ओव्हर फ्लोमुळे ते पाणी या ठिकाणी येवून साचत असते. तसेच परिसरात असलेल्या या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मात्र ग्रामपंचायत प्रशासनास काही एक देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे. या भागात एकही ग्रामपंचायत सदस्य राहत नसल्याने या भागात स्वच्छताच केली जात नाही आहे. तसेच महिलांच्या शौचालयामध्ये पथदिवे नसल्याने तेथील महिलांना अंधारातच शौचालयामध्ये जावे लागत आहे.

पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता
तेथील महिलांना ग्रामपंचायत सदस्यांकडे याची दखल घेण्याची विनंती केली होती. मात्र अजून तरी याकडे ग्रामपंचायत सदस्य याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी या गावातील घाणीचे साम्राज्य कधी दूर होणार? याची सुज्ञ नागरिक प्रतिक्षा करीत आहे. तसेच गावातील पाण्याची टाकी वारंवार ओथंबून वाहत असते. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असतो. तसेच हेच पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर डबके साचून चिखल निर्माण होत असल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पाण्याच्या टाकीतून होणारा पाण्याचा अपव्यय थांबवून बाहेर पडणार्‍या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.