चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी

0

लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने चित्रकला स्पर्धा : 4200 विद्यार्थ्यांचा सहभाग

लोणावळा । पत्रकार संघाने चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात कलाकारांकरीता खास कलादालन उभारण्याकरीता नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू, असे आश्‍वासन लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिले.

चित्रकला स्पर्धा
लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पत्रकार दिन व लोणावळा स्वच्छ सर्वेक्षण अभियान निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सुरेखा जाधव यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, बंडू येवले, पुजा गायकवाड, बिंद्रा गणात्रा, मंदा सोनवणे, जयश्री आहेर, शादान चौधरी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

चित्रांचे प्रदर्शन
पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी स्वच्छ लोणावळा या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये लोणावळा व परिसरातील विविध शाळांमधील 4200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिशुगट ते महाविद्यालयीन गट अशा सात गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील पहिले दहा स्पर्धक व शहरातील 35 नामवंत कलावंतांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन सध्या नगरपरिषद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कलादालन तयार करत भरविण्यात आले आहे. अतिशय नयनरम्य अशी ही चित्रं पाहण्याकरिता शनिवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान पत्रकार संघाच्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच कलाकारांचा कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.