सतना : चित्रकूट विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी झाली. यामध्ये काँग्रेस उमेदवार नीलांशू चतुर्वेदी 19 फेरीच्या मोजणीनंतर 14,333 मतांनी विजयी झाले. भाजप पहिल्या फेरीत पुढे होती. परंतु यानंतर प्रत्येक फेरीत भाजपची पीछेहाट झाली. एमपीचे भाजपअध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले की, या निकालाची समीक्षा केली जाईल. काँग्रेसला परंपरागत सीट असल्याचा फायदा मिळाला असून आम्ही जनादेशाचा स्वीकार करत आहोत.
9 अपक्षांसह 12 उमेदवार रिंगणात
काँग्रेस आमदार प्रेमसिंह यांच्या निधनानंतर ही जागा रिकामी झाली होती. चित्रकूटमध्ये 1 लाख 98 हजार 122 मतदार आहेत. यात 1 लाख 6 हजार 390 पुरुष, 91 हजार 730 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. येथे 9 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. एकूण 65.07 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पोटनिवडणुकीत 9 अपक्षांसह 12 उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढाई भाजपचे शंकरदयाल त्रिपाठी आणि काँग्रेसचे नीलांशू चतुर्वेदी यांच्यात होती.
भाजपसाठी महत्वाची निवडणूक
भाजप आणि काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपकडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अखेरच्या क्षणी प्रचाराचा धुरा सांभाळली होती. येथे त्यांनी अनेक सभा आणि रोड शो केले होते. याशिवाय प्रदेशअध्यक्ष नंदकुमार सिंह चौळान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी रॅली काढल्या होत्या. काँग्रेसकडून येथे माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सभा घेतल्या. ही जागा विरोधी पक्षनेते अजय सिंह यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव यांनीही येथे प्रचार केला होता.