चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची आत्महत्या

0

पुणे : ढोल ताशे चित्रपटाचे निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून शनिवारी रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली आहे. पत्नीच्या त्रासामुळे तापकीर यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मधून समोर आले आहे. विशेष म्हणजे तापकीर यांनी सुसाईड नोटमध्ये मुख्यमंत्र्यांनाही आवाहन केले आहे की, सर्व कायदे महिलांच्या बाजूनेच आहेत, पोलिसांनी पुरूषांचीही बाजू ऐकूण घेतली पाहिजे.

प्रेसिडंट हॉटेलमधील प्रकार
शनिवारी रात्री 12 च्या सुमारास त्यांनी ही पोस्ट टाकली होती. त्यानंतर आज सकाळी 11 च्या सुमारास हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. तापकीर काल रात्री प्रेसिडंट हॉटेलमध्ये थांबले होते. आज सकाळी 11च्या सुमारास हॉटेलच्या कर्मचार्‍यांना रूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने डेक्कन पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

मला घराबाहेर काढले
तापकीर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या सुसाइड नोटनुसार ढोल ताशे हा चित्रपट काढल्यानंतर त्यात आर्थिक नुकसान झाले, पण या सिनेमामुळे मानसन्मान मिळाला. या आर्थिक संकटातून वडील व बहिणीने वर काढले, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये ‘प्रियांकाने मला घराबाहेर काढले. गेली 6 महिने मी घरापासून व माझ्या मुलांपासून लांब राहत आहे. तसेच माझ्यावर नाही तसले आरोप करून आमच्या परिसरातील लोकांच्या घरोघरी जाऊन बदनामी केली. प्रियंकाच्या भावांनी तिच्या सांगण्यावरून मला मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या भावांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. माझी आणि माझ्या घरच्यांची किती इज्जत घालवणार? त्यापेक्षा मेलेले बरे, असे त्यांनी यात म्हटले आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची माफी मागितली आहे व सोबत ‘मी आईसोबत राहणार असल्याचा आनंद होत आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

कायदे महिलांच्या बाजूने
महिलांच्या बाजूने सर्व कायदे असल्यामुळे कित्येकदा पुरूषांची चूक नसताना देखील अन्यायाला सामोरे जावे लागते. पोलिसांनी महिलांची बाजू समजून घेत असताना पुरूषांचेही म्हणणेही ऐकले पाहिजे, अशी विनंती अतुल तापकीर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुसाईड नोटमध्ये केली आहे.

मुलांचा सांभाळ वडिलांनी करावा
तापकीर यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये आपल्या मुलांचे संगोपन वडिलांनी करावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सुसाइड नोटमध्ये लिहीले आहे की, माझी एकच इच्छा आहे, माझ्यानंतर मुलांचा संभाळ प्रियंका नाही करू शकणार म्हणून माझ्या मुलांचा संभाळ माझ्या वडिलांनी करावा आणि प्रियंकाला तिची ऐशो-आरामाची जिंदगी जगू द्यावे. जी तिला हवी आहे. अशी शेवटची इच्छा निर्माता अतुल तापकीर यांनी व्यक्त केली आहे.