चित्रपट निवडताना संहितेच्या आशयालाच मी महत्त्व दिले – ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर

0

‘झेनिथ एशिया सन्मान’ पुरस्कार प्रदान

पुणे : पारंपारिक चित्रपट सृष्टीत रमण्याऐवजी मी प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक रमलो. चित्रपट निवडताना मी संहितेच्या आशयाला महत्त्व दिल्याने मी चित्रपट स्वीकारण्याऐवजी अनेक चित्रपट नाकारतच गेलो. मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रियेची मला खंत वाटत नाही. मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

येथील आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित 9 व्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा ‘झेनिथ एशिया सन्मान’ नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या डेप्युटी डायरेक्टर कीर्ती तिवारी, चित्रपट महोत्सवाचे संयोजक सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवातील चित्रपट अर्काइव्ह थिएटर, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे दाखविण्यात येणार आहेत. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म फौंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिल्म न्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूटच्या सक्रीय सहयोगाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, पारंपारिक चित्रपटांमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम भूमिका दिल्या जातात. मात्र माझ्या चित्रपटांची स्त्री हीच केंद्रीय संकल्पना असायची. स्त्रियांचा परिवारात आणि समाजात मानसन्मान उंचावेल अशाच भूमिका मी स्त्रियांच्याबाबतीत आखत गेलो. कलेला कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. त्यात भावना गुंतवून भावना दुखवला गेल्या, असा दृष्टिकोन ठेवायला नको. यावेळी बोलताना कुमार शाहनी म्हणाले की, अमोल पालेकरांबरोबरच्या आठवणी समृद्ध करणार्‍या आहेत. पालेकरांसारखा अभिनेता, दिग्दर्शक यामुळे चित्रपट सृष्टीत अनेक नवीन विषय हाताळले गेले. प्रास्ताविक वीरेंद्र चित्राव यांनी केले. तर सतीश जकातदार यांनी आभार मानले.