पुणे । आदिवासी जमातीच्या जीवन संस्कृतीवरील छायाचित्रे पाहून त्यांच्या जीवनशैलीतील विविधतेची कल्पना येते. या प्रदर्शनातून त्यांचे राहणीमान, संस्कृती, आभूषणे पाहायला मिळाली. आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपतो. या चित्रप्रदर्शनमुळे पुणेकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडेल. आदिवासी जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नृत्य आणि कलाकौशल्य ते जगासमोर यावे आणि त्यांना त्याचा चांगला मोबदला मिळावा यासाठी आपण योगदान दिले पाहिजे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
जागतीक आदिवासी दिनानिमित्त रजनल अॅडव्हर्टाझिंग मार्केटिंंग असोसिएशन (रामा) आणि बालमुद्रा डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या सहाय्याने मुक्त छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील 16 राज्यांमधील 125 आदिवासी जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या इको फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रर्दशनाच्या उद्घाटनप्रसंगी टिळक बोलत होत्या.
घोले रोडवरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू असून 15 ऑगस्टपर्यंत 11 ते सायंकाळी 7.30 या वेळेत रसिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात लांजिया सोरा आणि गोंड हे पुरस्कार विजेते आदिवासी कलाकार तांदळाच्या साळीच्या टरफलापासून तयार केलेला गणपती, देवी बनविण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच या प्रदर्शनात आदिवासींच्या टॅटूचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील.