चित्राकडून अक्षराकडे नेणारी पुस्तके असावीत : ल. म. कडू

0

वंचित विकासतर्फे ’रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान

पुणे : ज्या मुलांना वाचता येत नाही, अशांनाही पुस्तक वाचल्याचा आनंद घेता आले पाहिजे. लहान मुलांना पुस्तके हे खेळण्याप्रमाणे वाटायला हवीत. बालसाहित्याची पुस्तके ही आकर्षक आणि चित्रांकडून अक्षराकडे नेणारी असावीत, असे मत बालसाहित्यिक ल.म. कडू यांनी व्यक्त केले. वंचित विकास संचालित ’निर्मळ रानवारा’तर्फे दिला जाणारा यंदाचा ’रानवारा कृतज्ञता पुरस्कार’ पुणे मराठी ग्रंथालयाच्या ग्रंथपाल संजीवनी अत्रे यांना कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि रोख 1001 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी विनया देसाई, संस्थेचे संस्थापक डॉ. विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, देवयानी गोंगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना बक्षिसे
ईशा पाटसकर, राजलक्ष्मी सर्वगोड, दिव्या हरगुडे, रिद्धी देवचक्के, अविस्मा मर्लेचा, रेहाना सय्यद, सुहानी काळे, शनाया बर्वे, प्राजक्ता क्षीरसागर, चिन्मयी कुलकर्णी, कुहू जोशी, ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी व मैत्रेय गानू या मुलांना उत्तम लेखन आणि चित्रासाठी ’इंदिरा गोविंद’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धेतील यशाबद्दल प्रसाद टिळक, निसर्ग भोसले, शर्वरी डफळे, योगेश म्हस्के, नियती नामे, रिया कुलकर्णी, स्वरदा पवार, अदिती गादिया, श्रद्धा मराठे, योगिता मोहिते, पूजा वर्मा, ओंकार भाले, माधव दोंतुलवाड, गणेश गायकवाड, साहिल कंदारे, आर्या जाधव या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

ग्रंथालय ज्ञानाचे भांडार
संजीवनी अत्रे म्हणाल्या, ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार आहे. येथे केवळ पुस्तके देणेघेणे होत नाही, तर ज्ञानाची देवाणघेवाण होते. ’रानवारा’सारख्या पुस्तकांतून मुलांना वाचनाची आवड लागेल. विनया देसाई म्हणाल्या, जे सुचेल ते लिहिता आणि सांगता आले पाहिजे. सुचलेले व्यक्त करण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. या मुलांना मोकळे होण्याची संधी वंचित विकासमुळे मिळत आहे.