नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी करणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ईडीनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगी शिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला आहे. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत एक टुमदार बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली आहे. याप्रकरणात चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे.